सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी वाळू तस्करीच्या विरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे वाळू तस्करांकडून प्रशासनाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या हेतूने संबंधित प्रांत व तहसीलदारांच्या हालचालींवर अहोरात्र पाळत ठेवली जात आहे.
प्रांत वा तहसीलदार यांच्या निवासस्थानापासून ते कार्यालयापर्यंत तसेच ते जेथे जेथे जातात, तेथे सर्व ठिकाणी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. संबंधितांवर यापूर्वी फौजदारी कारवाई झाली तरी पाळत ठेवण्याचे प्रकार न थांबता सुरूच असल्याचे दिसून येते.रात्रंदिवस पाळत ठेवली जात असल्यामुळे संबंधित अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मानसिक तणावाखाली आहेत.
सोलापूर जिल्ह्य़ात भीमा, सीना, नीरा आदी नद्या वाहतात. विशेषत: भीमा नदी महत्त्वाची मानली जाते. नदीच्या पात्रातून बेकायदा होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रभावी उपाययोजना राबविली होती.  दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार म्हणून काम करताना शिल्पा ठोकडे यांनी वाळू तस्करांविरुद्ध रोजच दोन हात केले होते.
निवासस्थानातून कार्यालयात व  कार्यालयातून निवासस्थानी जाईपर्यंत, कोठेही जायचे तर अधिकाऱ्यांच्या मोटारीमागे पाळत ठेवणाऱ्या मोटारसायकलस्वारांचा ताफा निघतो. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्रभर पाळत ठेवली जाते. या प्रकारामुळे अधिकारी तणावाखाली आले आहेत.