विधानसभा निवडणुकीसंदर्भात मंगळवारी दोन महत्त्वपूर्ण घटना जिल्ह्यात घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदार संघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. तर, महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्यामध्ये सहभागी होण्यासाठी खासदार राजू शेट्टी सायंकाळी खास विमानाने मुंबईला रवाना झाले. दरम्यान, दोन दिवसाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निरंक स्थितीला आज फाटा मिळाला असून आज चंदगड मतदार संघातून विश्वास पाटील व रामदेव सुतार या अपक्षांनी, तर शाहुवाडी मतदार संघात शेकापचे रिवद्रकुमार पाटील या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
चंदगड मतदार संघात कुपेकर घराण्यातील राजकीय कलह निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणखीनच विकोपाला गेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष, दिवंगत नेते बाबा कुपेकर यांच्या पश्चात चंदगड मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती संध्यादेवी कुपेकर या विजयी झाल्या. पण त्यावेळच्या निवडणुकीत संग्रामसिंह कुपेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. अपुरी राहिलेली इच्छा यावेळच्या निवडणुकीत पूर्ण करण्याच्या दिशेने संग्रामसिंह कुपेकर यांची वाटचाल सुरु होती. प्रसंगी आपल्या चुलतीविरोधात बंडाचा झेंडा उगारण्याची तयारी त्यांनी केली होती. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन आमदार कुपेकर यांनी यावेळची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळची निवडणूक होऊन जाईल आणि घराण्यात कायमस्वरुपी वितुष्ट निर्माण होईल असा समंजस विचारही त्यांनी केल्याचे दिसत आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आमदार कुपेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे महायुतीतील ताणलेले अंतर मंगळवारी दुपारनंतर बरेचसे सल झाले. शिवसेना-भाजपासह मित्रपक्षांना जागा वाटप करण्याबाबत चच्रेला वेग आला. या चच्रेत सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी सायंकाळी खास विमानाने तातडीने मुंबईला रवाना झाले. जागा वाटपाबाबत त्यांनी कोणतेही ठोस विधान केले नाही.  याबाबत बुधवारी सविस्तरपणे बोलू असे मोजकेच शब्द त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.