अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीने अखेर नगर शहरात तब्बल पंचवीस वर्षांनी परिवर्तन घडवले. शिवसेनेच्या भावनिक मुद्याचा बागुलबुवा राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप (४९ हजार ३७८ मते) यांनी परतवून लावत अनिल राठोड (४६ हजार ६१) यांचा ३ हजार ३१७ मतांनी पराभव केला. भाजपचे अ‍ॅड. अभय आगरकर यांना ३९ हजार ९१३ आणि काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी २७ हजार ७६ मते मिळवली. विजयी षटकार मारताना शेवटच्या चेंडूवरच राठोड त्रिफळाबाद झाले.
प्रमुख उमेदवारांपाठोपाठ नगरमध्ये ‘नोटा’ने (१ हजार ६१४) सर्वाधिक मते मिळवली. त्याखालोखाल इतर सात उमेदवार आहेत. एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांच्या नियंत्रणाखाली सकाळी आठ वाजता मतमोजणी मोजणी सुरू झाली. पहिला निकाल सकाळी ८.४५ वाजता जाहीर करण्यात आला, तर अंतिम निकाल दुपारी १.३० वाजता जाहीर करण्यात आला. मतमोजणीच्या ठिकाणी एकही उमेदवार फिरकला नाही. विजय घोषित झाल्यानंतरच संग्राम जगताप तेथे आले.
मतमोजणीच्या फेरीदरम्यान कधी राठोड, कधी आगरकर तर कधी जगताप पुढे अशी अत्यंत दोलायमान अवस्था होती. मोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या. पंधराव्या फेरीनंतर जगताप यांनी निर्णायक आघाडी घेतली. ती राठोड यांना मागे टाकता आली नाही. सावेडी उपनगरातून आगरकर यांना आघाडी मिळाली तर मध्यवर्ती भागाने राठोड यांना व मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव, केडगावमधून जगताप यांना आघाडी मिळाली. इतर उमेदवारांना मिळालेली मते अशी : आसाराम कावरे (बसप) ५८७, सचिन राठोड (अपक्ष) ४१२, अनिल शेकटकर (जदयु) १०६, विलास कराळे (अपक्ष) १४५, मकरंद कुलकर्णी (अपक्ष) १५०, आनंद लहामगे (अपक्ष) ९५ व हेमंत ढगे २२८. निवडणुकीत २ लाख ७४ हजार ८९२ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ९३४ जणांनी मतदान केले. १ हजार २६१ टपाली मतदानापैकी १६९ अवैध ठरल्या तर जगताप यांना ३७२, राठोड यांना ३१२, आगरकर यांना २३९ व तांबे यांना १४६ मते मिळाली.
महापौर संग्राम जगताप यांनी सर्वस्व पणाला लावत नियोजनबद्ध प्रचार करत निवडणूक लढवली व वडिलांच्या दोन पराभवांचा वचपा काढला. राठोड यांच्या पराभवाला आगरकर यांच्या उमेदवारीमुळे मतांत पडलेली फूट व महापालिकेच्या निवडणुकीतील राजकारण भोवले. ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेले आगरकर सर्व मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत व ते स्वत:ही जोमाने प्रचारात उतरले नाहीत, पक्षांतर्गत नाराजीही त्यांना काही प्रमाणात भोवली. तोच प्रकार तांबे यांच्याबाबत झाला, मात्र त्यांनी काँग्रेसचे पारंपरिक मतदान खेचत त्यात काही प्रमाणात वाढ केली.