मुस्लिमांचा मताधिकार काढा, असे थेट विधान मी माझ्या लेखामध्ये केलेलेच नाही. जर मुस्लिमांचा मताधिकार काढला तर व्होट बॅंकेचे राजकारण संपेल, असे लिहिल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये दिले. मुस्लिमांचा मताधिकार काढल्यास सध्या त्यांच्या बाजूने बोलणारे सगळे नेते शांत होतील, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या साप्ताहिक पुरवणीमध्ये गेल्या रविवारी लिहिलेल्या ‘रोखठोक’ सदरात संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाच्या ओवेसी बंधुंवर टीका केली होती. याच लेखामध्ये त्यांनी ‘जोपर्यंत मुसलमानी मतांचे फक्त राजकारण होत राहील तोपर्यंत या देशातील मुसलमानांना भवितव्य नाही. म्हणूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘व्होट बँकेची अशी सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा’’ अशी मागणी केली होती आणि ते खरेच होते. ज्या दिवशी मुसलमानांचा मताधिकार काढला जाईल त्यावेळी सर्व सेक्युलरवाद्यांचे मुखवटे गळून पडतील.’, असे लिहिले होते. याच लिखाणावरून देशभरातून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लिमांचा मताधिकार काढा, असे आपण थेटपणे लिहिलेले नसल्याचे सांगितले.