सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेली पाच वर्षे दबदबा ठेवणारे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी आता अचानकपणे याच बँकेचे संचालक मंडळाकडे कोटय़वधींची कर्जाची रक्कम थकल्याने बँक अडचणीत आल्याची लेखी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरही त्यांचे लक्ष वेधले आहे.
मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलून संजय शिंदे यांना महत्त्व आले होते. माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे धाकटे बंधू असलेले संजय शिंदे यांनी गेली पाच वर्षे जिल्ह्य़ात अजित पवार गटाचे राजकारण करताना मोहिते-पाटील गटाच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पवार काका-पुतण्यांचा आदेश झुगारून माढय़ात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा प्रचार केला नव्हता. करमाळा येथून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी सुरू आहे.
दरम्यान, काल सोमवारी अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे पक्षाचा निर्धार मेळावा झाला. त्यावेळी पक्षात असूनदेखील संजय शिंदे हे या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. परंतु यानिमित्ताने त्यांनी सोलापूर जिल्हा बँकेतील आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांच्यामार्फत अजित पवार यांना लेखी पत्र पाठविले. बँकेच्या संचालक मंडळाकडेच कोटय़वधींच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे बँक अडचणीत आल्याची त्यांची तक्रार आहे. गेली पाच वर्षे शिंदे हेच जिल्हा बँकेच्या सत्ताकारणातील प्रमुख सूत्रधार आहेत.
संजय शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणाबरोबर माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावरही अजित पवार यांचे लक्ष वेधले आहे. या भागातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील उभी पिके पाण्याविना उद्ध्वस्त होत असून केवळ शिंदे बंधूंना अडचणीत आणण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरणे योग्य नाही, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र पाणी अडविणारे कोण, हे त्यांनी नमूद केले नाही.