राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वरूड परिसर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या पाचव्या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी, ९ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार राहणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी उपस्थित राहतील. सकाळी ७ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यात राष्ट्रसंतांच्या विचारांची पुस्तके व ग्रामगीता राहील. सकाळी ११ वाजता ‘ग्रामगीता आणि ग्रामविकासाच्या नव्या दिशा’ या विषयावर पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात प्रकाश महाराज वाघ, अ‍ॅड. दिलीप कोहळे, डॉ. भास्कर दिघे व नरेंद्र आरेकर सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक हरिभाऊ वेरुळकर यांची मुलाखत डॉ. प्रदीप विटाळकर आणि ज्ञानेश्वर रक्षक घेणार आहेत. डॉ. मधुकर वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘राष्ट्रसंतांचे स्फुट साहित्य आणि आधुनिकता, महात्मता व प्रबोधन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. डॉ. राजन जैस्वाल, प्रा. ज्ञानेश वाकुडकर व कृष्णा राऊत या परिसंवादाचे वक्ते राहतील.  संमेलनाचा समारोप दुपारी ४.३० वाजता अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख व खासदार दत्ता मेघे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष उल्हास पवार आणि कुलगुरू डॉ. विलास सपकाळ उपस्थित राहतील. संमेलनाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. महेशकुमार येन्की, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे आणि गिरीश गांधी यांनी केले आहे.