जलयुक्त शिवारच्या कामाप्रकरणी २० हजारांची लाच स्वीकारताना फडतरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सरपंचाला अटक करण्यात आली. वालचंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी, जलयुक्त शिवार योजनेतर्गंत फडतरी येथील गुप्तलिंग तळ्यातील गाळ काढण्यासाठी तक्रारदाराने जेसीबी मशीन भाड्याने दिल्या होत्या. मशिनच्या भाड्याच्या बदल्यात तलावातील वाळू तक्रारदारास देण्याचे ग्रामपंचायतीने ठरवले होते. याबाबत ग्रामपंचायतीने ठरावही केला होता. परंतु, फडतरीचे सरपंच विनोद रूपनवर यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले.

रूपनवर यांनी स्व मालकीच्या हॉटेल कृष्णाईमध्ये तक्रारदारास बोलवले. तेथे सागर गुळीम नावाच्या खासगी व्यक्तीमार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर आणि नातेपुते पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या टीमने ही कारवाई केली.