रावसाहेबांवर निवेदनात मार्मिक टीका-टिपणी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषा वापरल्याने त्यांचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करून दानवेंना साले ही पदवी साभार परत करत असल्याचे निवेदन सातारा येथे प्रशासनास देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील, अ‍ॅड. विजयराव कणसे, धनश्री महाडीक, भगवानराव आवडे, भयासाहेब जाधवराव, बाळासाहेब शिरसट, रशीद शेख, मालन परळकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की खासदार रावसाहेब दानवे यांच्यासारखे जबाबदार नेते शेतकऱ्यांसाठी साले या शब्दाचा पावर करतात त्याअर्थी हा शब्द एक मोठा बहुमान असावा, अशी आमची धारणा आहे. तसे नसते तर जगाच्या पोशिंद्यासाठी शब्दाचा कदापिही वापर झाला नसता.

कर्जमाफी, उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव आणि शेतमालाच्या शासकीय खरेदीची तरतूद सरकारमार्फत नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलेली साले ही पदवी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने साभार परत करत आहोत. साले ही पदवी धारण करण्याची आपली पात्रता नाही, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. त्याऐवजी ही उपमा दानवे यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वालाच अधिक शोभून दिसते, असेही बळिराजाचे मत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आपल्यामार्फत खासदार दानवे यांना साले ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. अशी मार्मिक टीका-टिपणींचे काँग्रेसने निवेदनात केली आहे.