‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा

अभिनेते आमीर खान यांच्या ‘पानी फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पध्रेच्या निमित्ताने वरूड तालुक्यातील अनेक गावांमध्ये श्रमदानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचे मोजमाप सुरू असून लवकरच या कामांचे परीक्षण होणे अपेक्षित असल्याने या स्पध्रेच्या विजेत्या गावांविषयीची उत्कंठा ताणली गेली आहे.

प्रत्येक गावाने, शहराने पाणलोट व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, यावर या स्पर्धेचा भर होता. पहिल्या सत्रात अमरावती जिल्ह्यातील वरूड, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तीन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. वरूड तालुक्यातील ४६ गावांमध्ये ही स्पर्धा झाली. स्पध्रेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये चुरसच लागली होती. वॉटर कप स्पध्रेच्या पहिल्या सत्राचा कालावधी २० एप्रिल ते ५ जून होता. पहिल्या तीन गावांना रोख बक्षीसे देण्यात येणार असून प्रथम बक्षीस ५० लाख, द्वितीय ३० लाख, तर तृतीय २० लाख रुपयांचे आहे. स्पध्रेचा कालावधी ४५ दिवसांचा ठेवण्यात आला होता. गावांना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विकेंद्रित पाणलोट व्यवस्थापनाच्या बाबतीत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक स्वयंसेवक आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग या स्पध्रेत होता.

वरूड तालुक्यात ६५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५३ ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी पाच प्रतिनिधींना अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. जलसंधारणाच्या सर्व कामांचे डिजिटल मॅपिंग केले जात असून शास्त्रीयदृष्टय़ा मोजमाप होणार आहे. स्पध्रेच्या कालावधीत अभिनेते आमीर खान वाठोडा या गावात श्रमदानासाठी येऊन गेले. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे यांच्यासह आमदार डॉ. अनिल बोंडे हेही सहभागी झाले होते. सुमारे ३०० गावकऱ्यांनी ३० तासांमध्ये बंधारा उभारला. इतर गावांमध्ये लोकसहभागातून पाणी अडवण्याचे आणि जिरवण्याची कामे पूर्णत्वास गेली आहेत. टेंभूरखेडा, गव्हाणकूंड, वाठोडा, सावंगा, वाडेगाव, पोरगव्हाण या गावांमध्ये लक्षणीय काम झाले आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया.. डार्क झोनमध्ये

वरूड तालुका डार्क झोनमध्ये गणला गेला आहे. संत्रीबागांमुळे या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्नियाही म्हटले जाते, पण भूजलाच्या अतिउपशामुळे अनेक भागात जलपातळी १ हजार फुटापर्यंत खाली गेली. दरवर्षी सुमारे ५० ते ६० सें.मी. खाली जलपातळी जात असताना गावकऱ्यांमध्ये लोकसहभागातून जलसंवर्धनाची झालेली कामे सकारात्मक मानली जात आहेत. या कामांचे आता मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले असून कोणत्या गावाची निवड वॉटर कप स्पध्रेत विजेते म्हणून होते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.