जीवनातील कटू-गोड प्रसंगांचा विसर पडायला लावणाऱ्या सहा दिवसांतील सुरेल स्वरांच्या ‘अमृतवर्षिनी’ने हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगता किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने रविवारी झाली.  
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. रविवारी दुपारच्या सत्राची सुरुवात गजाननबुवा जोशी यांच्या नाती अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या गायनाने झाली. ‘मुलतानी’ आणि ‘मारवा’ या रागांनंतर त्यांनी कबीराचे भजन सादर करून मैफल संपविली. शौनक अभिषेकी यांनी कर्नाटक शैलीतील ‘अमृतवर्षिनी’ रागातील पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या दोन बंदिशी सादर केल्या. ‘भवानी दयानी’ ही ‘अडाणा’तील भक्तिरचना आणि त्यानंतर ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’ ही कविवर्य बा. भ. बोरकर यांची काव्यरचना सादर केली. ज्येष्ठ गायक पं. बसवराज राजगुरू यांचे शिष्य आणि कर्नाटक शैलीचे गायक परमेश्वर हेगडे यांनी ‘शुद्धकल्याण’ रागगायनानंतर एक भजन सादर केले.
उस्ताद शाहीद परवेझ आणि पं. अतुलकुमार उपाध्ये यांची सतार आणि व्हायोलिन सहवादनाची मैफल रंगली. त्यांनी आपल्या वादनातून ‘चारुकेशी’ रागाचे सौंदर्य उलगडले. त्यांना मुकेश जाधव यांनी तबल्याची समर्पक साथसंगत केली. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांच्या गायनानंतर किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या प्रतिभासंपन्न मैफलीने या महोत्सवाची सांगता झाली.
संतूर या वाद्यावर पं. शिवकुमार शर्मा यांनी साकारलेल्या ‘अंतध्र्वनी’ या रागाच्या आलापात गुंग झालेल्या रसिकांना ‘अंतध्र्वनी’ची प्रचिती आली. या अनोख्या वादनाने रविवारी सकाळच्या सत्रात रंग भरले. कल्पना झोकरकर यांच्या गायनाने पहिल्या सत्राचा आरंभ झाला. त्यांनी ‘भूपाल तोडी’ या अनवट रागातील पं. श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या दोन बंदिशी सादर केल्या. ‘सिंदुरा काफी’ रागातील टप्पा आणि त्याला जोडूनच तराणा गायल्यावर त्यांनी ‘रसिया को नारी बनावो री सखिया’ या रचनेने मैफलीची सांगता केली. विजय कोपरकर यांनी आपल्या गायनातून ‘बसंत मुखारी’ या रागाचे सौंदर्य उलगडले. ‘परमेश्वरी’ रागातील एक बंदिश सादर केल्यावर ‘सन्यस्त खङ्ग’ मधील स्वा. सावरकर यांचे ‘शतजन्म शोधिताना’ हे पद सादर करून रसिकांना जिंकले.
पाचव्या सत्राच्या अखेरीस अमेरिकेत ऑक्टोबर १९८२ मधील मैफलीत पं. भीमसेन जोशी यांनी गायलेला ‘वृंदावनी सारंग’ राग आणि ‘जो भजे हरि को सदा’ हे भैरवीतील भजन रसिकांना पडद्यावर पाहता आले. तर पंडितजींचा नऊ वर्षांचा नातू विराज याने प्रत्यक्ष स्वरमंचावर येऊन आपली गानसेवा रुजू केली. महोत्सवाच्या हीरकमहोत्सवानिमित्त पं. भीमसेन जोशी यांना दीर्घकाळ साथसंगत करणारे बुजुर्ग कलावंत, दिवंगत कलाकारांचे वारस आणि महोत्सवाची व्यवस्था चोखपणे पाहणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.