सावंतवाडी संस्थानकालीन शहरात पर्यावरणीयदृष्टय़ा महत्त्व वाढावे म्हणून सावंतवाडी नगरपालिकेत शहराच्या पक्ष्याची निवड करण्यासाठी मतदान पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे. शहराचा पक्षी म्हणून मलबारी ट्रॅगॉन (कर्णा) व भारद्वाज (कुकुड कोंबा) या दोनपैकी एका पक्ष्याची मतदानाने निवड होणार आहे. या दोनपैकी एका पक्ष्यासाठी १ ते ५ मे या कालावधीत मतदान केले जाईल. त्याची मतमोजणी दि. ६ मेला होईल. त्यानंतर सावंतवाडी शहराचा पक्षी जाहीर होईल. त्यासाठी सकाळी ९ पासून मतदान होईल. नगर परिषद कार्यालय, जगन्नाथराव भोसले स्मृती उद्यान, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, जलतरण तलाव जिमखाना मैदान व फ्रुट अ‍ॅण्ड फ्लॉवर महोत्सवस्थळी मतदान केंद्रे आहेत तसेच ऑनलाइन फेसबुक, ट्विटरवरही मतदान करता येणार आहे. महाराष्ट्र दिनापासून सलग पाच दिवस मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. वय वर्षे १५ पासून शहरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार ठेवण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले. या वेळी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, कीर्ती बोंद्रे, संजय पेडणेकर, अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत उपस्थित होते. सावंतवाडी शहरात पशुपक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नगर परिषदेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नागरी प्राणी म्हणून ‘मुंगूस’ची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. आता नगरपक्षीची निवड करण्यात येणार आहे. संस्थानकालीन सावंतवाडी शहराला विलोभनीय निसर्गसौंदर्य लाभले आहे. या शहराला नरेंद्र डोंगरासारखा जैवविविधतेने नटलेला डोंगरदेखील आहे. त्यामुळे नगरपक्षी निवडून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी नगर परिषद उपक्रम हाती घेणार आहे. सावंतवाडी शहराचा पक्षी म्हणून मलबारी ट्रॅगॉन (कर्णा) व भारद्वाज (कुकुड कोंबा) या दोनपैकी एका पक्ष्याची मतदानाने निवड होईल. यामुळे पक्ष्याबद्दल पर्यावरण, पक्षिप्रेमींत कुतूहल निर्माण झाले आहे.