सावंतवाडी रोड रेल्वे (मळगाव) स्टेशनवर रेल्वे टर्मिनसचे काम सुरू आहे. हे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे मंत्र्यांनी घोषणा करूनही वेळेत हे काम झाले नसल्याने प्रवासी वर्गात चर्चा आहे. कोकण रेल्वेचा सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन, नवीन फलाट, रेल्वे सायडिंग उभारणीकरिता २१ कोटी २० लाख रुपयांचा निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला. तसेच या स्टेशनवर शंभर रुमचे पर्यटनाच्या धर्तीवर हॉटेलही उभारण्याचा संकल्प रेल्वेमंत्रालयाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आदींच्या उपस्थितीत सावंतवाडी रोड स्थानकावर भुमिपूजन करण्यात आले. टर्मिनसचा शुभारंभही लवकरच करण्याची घोषणा झाली. ऑक्टोबर महिना संपला. सध्या सुरू असणाऱ्या कामामुळे टर्मिनसकरिता उशीर होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने बोलताना टर्मिनचे काम वेळीच पूर्ण होईल, असे म्हटले आहे. कोकण रेल्वेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनात निश्चितच वाढ झाली आहे.
सावंतवाडी येथे नव्याने होणाऱ्या रेल्वे टर्मिनसमुळेही भविष्यात सिंधुदुर्गमध्ये रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे, असे पालकमंत्री केसरकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसअंतर्गत विविध कामे करण्यात येणार असून
डिसेंबर २०१५ पर्यंत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची १३ कोटींची कामे पूर्ण होणार असून, टप्प्याटप्प्याने ३० कोटींची कामे पूर्ण अस्तित्वात येणार आहेत. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसमुळे जिल्ह्य़ाच्या पर्यटनात व आर्थिक सुबत्ता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होईल असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी इश्यु केला होता, पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्यक्षात कृती करून चालना दिली आहे. रेल्वे गाडय़ांसाठी नवीन फलाट उभारण्यात येत आहेत, तसेच उड्डाणपुलाचीदेखील कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरच्या अखेपर्यंत टर्मिनसचे काम अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात हेही काम वेगाने सुरू नसल्याने पुढील काही दिवस टर्मिनसचे स्वप्न पुढे जाईल, असे प्रवासीवर्गात बोलले जात आहे.