सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहासाठी यापूर्वी सोलापूर व शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्जे उचलण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्यात आणखी भर पडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्याने ऊस वाहतुकीच्या करारासाठी वाहनधारक व शेतक ऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने बँकेतून परस्पर कर्जे उचलले गेल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.

सोलापुरातील कॅनरा बँकेच्या शाखेतून कल्याणराव मेंदगुडले (रा. येळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या वाहनधारकाच्या नावावर लोकमंगल साखर कारखान्याने १५ लाखांचे कर्ज उचलल्याचे आढळून आले आहे. मेंदगुडले यांनी एका फायनान्स कंपनीकडून स्वत:साठी कर्ज घेण्यासाठी सिव्हील रिपोर्ट काढल्यानंतर त्यांच्या नावावर लोकमंगल साखर कारखान्याने १५लाखांचे कर्ज उचलल्याची माहिती उघडकीस आली. मेंदगुडले यांनी स्वत: कॅनरा बँंकेत स्वत:चे खातेदेखील उघडले नाही. दुसरीकडे त्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलताना साखर कारखान्यासह बँंकेनेही मेंदगुडले यांना कर्ज मंजुरी व कर्ज अदा केल्याची माहिती पोहोचू दिली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात मेंदगुडले यांनी तातडीने लोकमंगल साखर कारखान्याशी संपर्क साधून जाब विचारताच कारखान्याने एका दिवसात कर्जाची व्याजासह एकूण रक्कम १७ लाख २४ हजार रुपये कॅनरा बँंकेत भरून टाकली.या प्रकरणात अनेक वाहनधारक व शेतकऱ्यांच्या नावाने लोकमंगल साखर कारखान्याने परस्पर कर्जे उचलून विनियोग केल्याचे कळते.

याबाबत पोलिसांत फसवणुकीची तक्रार करणार असल्याचा इशारा देताच कारखान्याने दुसऱ्याच दिवशी कर्जाची संपूर्ण रक्कम भरून टाकली. यासंदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे मेंदगुडले यांनी म्हटले आहे.म्यासंदर्भात लोकमंगल साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही तर नेहमीचीच प्रक्रिया असून यात विशेष असे काहीच नसल्याचे स्पष्टपणे कबूल केले. तर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली असेल तर त्याची चौकशी होऊन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले .

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाने यापूर्वी शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर बँंकांतून परस्पर कर्जे घेतली होती. ‘लोकमंगल’साठी भाग गोळा करण्याच्या हेतूने अशी कोटय़वधींची कर्जे शेतकऱ्यांना माहीत पडू न देता परस्पर उचलली गेली होती.  नंतर सेबीनेच लोकमंगलला फटकारत भाग गोळा करण्यावर प्रतिबंध घातले होते. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी आपली बाजू मांडताना ही नियमितता असून शेतकऱ्यांना फसविल्याचे नाकारले होते.

कर्ज तर कारखानाच फेडणार

मेंदगुडले यांनी सांगितले की, मी कॅनरा बँकेत स्वत: खाते उघडलेसुध्दा नाही. माझ्या मालकीची एक गुंठादेखील जमीन नाही. तरीही लोकमंगल कारखान्याने माझ्या नावे परस्पर १५ लाखांचे कर्ज कॅनरा बँकेतून घेतले. ही माहिती उजेडात आली तेव्हा धक्काच बसला. लगेचच लोकमंगल कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून जाब विचारला. तेव्हा त्यांनी मेंदगुडले यांना, तुमचे केवळ नाव  आहे. कर्ज तर कारखानाच फेडणार आहे, असे सांगून जणू काही घडलेच नाही, असा पवित्रा घेतला.