जिल्ह्य़ात ऑक्टोबर २०१४ ते जून २०१५ या नऊ महिन्यांसाठी ४८ कोटी ४० लाख रुपये खर्चाचा, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निवारण आराखडा जिल्हाधिका-यांकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत घेण्यात आला. आराखडय़ात दरवर्षीच्याच उपाययोजानांचा समावेश आहे, नावीन्याचा अभाव आहे.
जिल्ह्य़ास ६२६ टँकरद्वारे ७५१ गावे, २ हजार ३१८ वाडय़ावस्त्यांना पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाणी टंचाई निवारणासाठी आराखडय़ात १ हजार १३३ उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
समितीची सभा जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दिरंगाईने सादर झालेल्या या आराखडय़ाबद्दल मात्र कोणी प्रश्न उपस्थित केला नाही. विहिरींचा गाळ काढणे, त्या खोल करणे, १६२ खासगी विहिरी अधिग्रहित करणे, प्रगतिपथावरील ३३ नळ योजना जलदगतीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, ४ तात्पुरत्या नळ योजना घेणे, ३०६ कूपनलिका खोदणे आदी उपाययोजना आहेत. सध्या जिल्ह्य़ात ८ गावे व ३१ वाडय़ा येथील सुमारे २१ हजार लोकसंख्येस १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राहुरी, पाथर्डी, नेवासे व नगर या चार तालुक्यांतील ४३ गावांसाठी वांबोरी पाइप चारी कार्यान्वित करण्यात आली आहे. मुळा धरणातून ६८० दशलक्ष घनफूट पाणी उचलून ५८ किमी अंतरातील ९४ पाझर तलाव, कोल्हापूर बंधारे, गावतळे व साठवण बंधारे भरले जातात. त्याचा परिसरातील विहिरींनाही अप्रत्यक्ष लाभ होतो, परंतु योजनेचे ६० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. हे बिल टंचाई निवारण निधीतून विशेष बाब म्हणून भरावेत, अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला.
मिरजगाव येथील पिण्याच्या पाण्याची टाकी काही दिवसांपूर्वी कोसळली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नवी टाकी उभारण्यासाठी पाहणी करून, मजिप्राच्या मुख्य अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली. तोपर्यंत मिरजगावच्या पाणीपुरवठय़ाचे काय, हा प्रश्न अधिका-यांनी अनुत्तरितच ठेवला. सभेस उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे तसेच सदस्य सुभाष पाटील, हर्षदा काकडे, संदेश कार्ले, केशव भवर, राजेंद्र कोठारी तसेच अधिकारी उपस्थित होते.