ज्वारीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्हय़ात यंदा केवळ निम्म्याच क्षेत्रावर (५५ टक्के) ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यातही परतीच्या पावसाची आशा मावळल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील ज्वारीची परिस्थिती बिकट झाली आहे. परिणामी, चारा उत्पादनात मोठी घट होणार आहे. दरम्यान, जिल्हय़ात टंचाई परिस्थिती जाणवू लागली असून संगमनेर, नगर व जामखेड तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे १६ हजार लोकसंख्येसाठी ९ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हय़ात आतापर्यंत केवळ ७६ टक्के पाऊस झाला आहे. जिल्हय़ास परतीच्या पावसाची आशा होती. दिवाळीच्या दरम्यान नगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत, पारनेर भागांत हलका पाऊस झाला. मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाही. हलक्या व जिरायती जमिनीतील ज्वारीची पिके सुकू लागली आहेत. रब्बीसाठी जिल्हय़ात ७ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती. परंतु केवळ ३८ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
ज्वारीचे ५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते. परंतु केवळ २ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. मक्याचे ५ हजार ३७२ व हरभऱ्याचे ११ हजार ८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाअभावी करडईचे क्षेत्र वाया गेले आहे. थंडी वाढू लागल्याने तुलनेत ज्वारीला फायदा होऊ लागला आहे. सध्या मुळा व निळवंडय़ाचे आवर्तन सुरू आहे. मात्र घोड व कुकडी कालव्याच्या आवर्तनाची मागणी आहे.
पाणी असलेल्या ठिकाणी ज्वारीखालील क्षेत्र हरभऱ्याकडे वळेल. तसेच पाटपाण्याच्या क्षेत्रात गव्हाची पेरणी वाढणार आहे. मात्र पाणी उपलब्ध नसलेल्या क्षेत्रात कांदा, मका, हरभरा वाढणार आहे.
दरम्यान, जिल्हय़ात पाणीटंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. नगर तालुक्यात ५, संगमनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी २ अशा एकूण ९ टँकरने नागरिकांना पिण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने टंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शनिवारी बैठक होणार आहे.