बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांना निलंबित करण्यात आले, तर सर्वोच्च न्यायालयाने राहुल व सुरज बोम्मावार, राकेश चेकुरवार, कुरेवार यांचा जामीन फेटाळल्यानंतरही हे चौघे फरार आहेत.
गडचिरोलीतील बहुचर्चित १८ कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने समाजकल्याण व आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण संस्थाचालक व प्राचार्याचाही समावेश आहे. या सर्वानी एकत्रितपणे हा गैरव्यवहार केलेला आहे. या घोटाळ्यातील संशयित आरोपी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे संचालक अमित बंदे यांच्यासह दोन लिपिकांना गडचिरोली न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय बागडे, संजय सातपुते यांना महिनाभरापूर्वीच अटक
करण्यात आली.
अमित बंदे याला २३ मार्चला अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. अमित बंदे, तुकाराम बरगे, विजय बागडे व संजय सातपुते यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.

कुणाचीही पाठराखण नाही
दिगंबर मेंडके यांच्या जामीन अर्जावर ६ एप्रिलला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. मेंडके व लिपिक सातपुते यांच्या निलंबनाचे आदेश २४ फेब्रुवारी २०१५ रोजी काढण्यात आल्याचे आदिवासी विभागाचे उपसचिव चं.ज.देशपांडे यांनी कळविले आहे. आदिवासी विकास विभाग किंवा मंत्रालयाने या दोन्ही अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारे पाठराखण केली नसून मेंडके यांना अटक झाल्यानंतर ४८ तासांतच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. पाच संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीची सर्वाधिक रक्कम हडपणाऱ्या सुरज बोम्मावार, राहुल बोम्मावार, राकेश चेकुरवार, कुरेवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही जामीन फेटाळल्यानंतर आता हे चौघेही फरार झाले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.