अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बसची धडक लागल्याने शरिफा ताजुद्दीन मुकादम ही शाळकरी मुलगी (वय १४ वष्रे) जागीच ठार झाली, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे वातावरण काही काळ तंग झाले. पण संबंधित बसच्या चालकाला निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर तणाव निवळला.
येथील गोगटे महाविद्यालयाच्या परिसरातील शाळकरी मुलांची वाहतूक करण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यापैकी एक बस महाविद्यालयाच्या मैदानाजवळच्या लाला कॉम्लेक्स येथून जात असता मिस्त्री हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या शरिफासह (रा. मजगाव) दोघी जणींना या बसची धडक बसली. त्यापैकी शरिफाच्या डोक्याला मार बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू ओढवला. तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेचे वृत्त कळताच तेथे मोठय़ा प्रमाणात जमाव जमला. बसचालकाविरुद्ध कारवाई केल्याशिवाय शरिफाचा मृतदेह तेथून न हलवण्याची भूमिका काही जणांनी घेतली.
तसेच बसवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला. अखेर संबंधित बसच्या चालकाला निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर वातावरण निवळले आणि जमाव पांगला.