पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी- चिंचवडच्या नेहरू नगर भागात घडली. संदेश लांडगे असं या गळफास घेणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज संध्याकाळी ही घटना उघडकीला आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु नगर येथे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या संदेशने त्याच्या राहत्या घरात साडीच्या साहाय्याने लाकडी बांबूच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संदेशने घराची कडी लावली होती. ही घटना आज संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास घडली. शेजारच्यांना काही शंका आल्याने त्यांनी संदेशच्या घराचा दरवाजा तोडत त्याच्या घरात प्रवेश केला. मात्र तोपर्यंत संदेशचा जीव गेला होता. घरात कोणी नसताना संदेशने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे आई वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. संदेश लांडगेने आत्महत्या का केली याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्याचा देह शवविच्छेदन करण्याकरीता नेण्यात आला आहे. पुढचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

पौगंडावस्थेत म्हणजेच किशोरवयामध्ये मुलामुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हा काळ अतिशय नाजूक असतो. राग, चीड, कुतूहल, नैराश्य अशा सगळ्याच भावना फार तीव्रतेने व्यक्त होतात. या भावना जर व्यक्त झाल्या नाहीत तर त्या मनातच फार तीव्रतेने राहतात. अशावेळी भावनेच्या भरात त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. त्याची बातमी तर होते. पण त्या कृतीच्या मागचं खरं कारण सांगू शकणारा काळाच्या पडद्यामागे गेलेला असतो.

या कारणांमुळे या वयातल्या मुलांना योग्य प्रकारे समुपदेशन मिळणं गरजेचं आहे. आणि या कामी मुलामुलींच्या पालकांनी, त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्याशी योग्य संवाद ठेवणं गरजेचं आहे.