जिल्हा परिषद सेस फंडातून करावा लागतो लाखो रुपयांचा खर्च

विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी शासनाकडून कार्यक्रम दिला जातो. मात्र त्यासाठी लागणारा निधी देण्यास शासन उदासीन आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेमार्फत तालुका व जिल्हा  साडेबारा लाख रुपयांचा निधी सेस फंडातून खर्च करावा लागत आहे. जिल्हा स्तरासाठी पाच लाख रुपये व तालुका स्तरासाठी साडे सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हाच निधी शासनाकडून आल्यास जिल्हा परिषदेचा निधी अन्य विकास कामांसाठी राबवण्यास मदत होईल असे जिल्हा परिषदेकडून बोलले जात आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व समजावे म्हणून ४२ व्या राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुका व जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्याचे आदेश शासनाने प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले आहेत. विज्ञान, गणित व पर्यावरण व लोकसंख्या या विषयानुसार विज्ञान प्रदर्शन भरविण्यात यावे अशी लेखी सुचना शासनाने दिली आहे. ११ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्याचा कार्यक्रम शासनाने आखून दिला आहे. त्याप्रमाणे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शासनाकडून फक्त कार्यक्रमाचा आराखडा देण्यात आला आहे.

परंतु त्यासाठी लागणारे निधी देण्यास शासन उदासीन ठरला आहे. त्याचा फटका जिल्हा परिषदेला बसतो. रायगड जिल्ह्य़ात गेल्या आठ दिवसापासून तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक ही सहभाग घेऊ लागले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी साडे सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाकडून विज्ञान प्रदर्शनासाठी निधी मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हा निधी उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व समजावे या दृष्टीने पाऊल उचलले आहे. शासनाकडून हाच निधी उपलब्ध झाल्यास सेस फंडातून विज्ञान प्रदर्शनासाठी खर्च करण्यात येणारा निधी अन्य विकास कामांसाठी राबविण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.