आजची तरुण पिढी समाज माध्यम व व्यसनांमध्ये गुरफटली असल्याबाबत नेहमी चिंता व्यक्त होते. या दुष्टचक्रातून सुटलेले काही तरुण पैशांच्या मागे धावत असल्याचे चित्रही कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येते. मात्र त्यास अपवाद ठरले, जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ हे गाव. या गावातील उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या गावाला देशातील पहिले विज्ञानगाव बनविण्याचा आगळावेगळा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याकरिता वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा जागर सुरू आहे.

राज्यात वाचनसंस्कृती रुजावी म्हणून राज्य सरकारने सातारा जिल्ह्य़ातील भिलार येथे पुस्तकांचे गाव उभारण्यासाठी पुढाकार घेतला. हा प्रकल्प आकारास येण्याआधीपासून कल्याणेहोळ गावातील तरुणाई विज्ञानाचे गाव बनविण्यासाठी धडपड करीत आहे. नोबेल फाऊंडेशन व कल्याणेहोळ ग्रामपंचायत यांच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त विज्ञानगाव प्रकल्पांतर्गत गावात बालविज्ञान संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. या अंतर्गत दर सोमवारी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक सादरीकरण, वैज्ञानिक चित्रपट, व्याख्याने, स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात येत असून पंधरा दिवसातून एकदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एकत्रित करीत आधुनिक शेती आणि पीक पद्धतींबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे; त्यासाठी गावात महिला आरोग्य विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर महिन्याला गावात स्त्रीरोगतज्ज्ञ समुपदेशन, तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागात विज्ञानविषयक प्रकल्प राबविणारे कल्याणेहोळ हे राज्यातील पहिले गाव आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक घरात भारतीय वैज्ञानिकांचे छायाचित्र लावण्यात येत आहे. तसेच गावातील ८० विजेच्या खांबांवर शास्त्रज्ञांची माहिती लावण्यात आली आहे. गावातील १५० झाडांना वैज्ञानिकांचे नाव देऊन तसे फलकही लावण्यात आले आहेत. बालविज्ञान संस्कार केंद्रासाठी ग्रामपंचायतीने सभागृह उपलब्ध करून दिले आहे.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
IGI Aviation Bharti 2024
१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! IGI एव्हिएशनकडून १०७४ जागांसाठी भरती, एवढा मिळणार पगार

कल्याणेहोळ ग्रामपंचायतीकडे उत्तर महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित सभागृह आहे. त्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. नोबेल फाऊंडेशनचे जयदीप पाटील यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. नोबेल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या तीन वर्षांत जनजागृतीसाठी ३५० व्याख्यानांच्या माध्यमातून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रकल्पासाठी गावातील राजकारण बाजूला ठेवण्यात आले. सर्वपक्षीय व ग्रामस्थ एकत्र आल्याने हा प्रकल्प जिल्ह्य़ात चर्चेचा विषय ठरला आहे. यासाठी सावली फाऊंडेशन व दीपस्तंभ फाऊंडेशनचेही सहकार्य लाभत आहे.

ग्रामीण मुला-मुलींमध्ये प्रचंड क्षमता आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारत विज्ञानाच्या नोबेल पारितोषिकापासून दूर आहे. खेडोपाडी असे प्रकल्प उभे राहिले तर देशात शास्त्रज्ञांच्या पिढय़ा घडतील. ग्रामीण समस्यांवर विज्ञानाकडे उत्तर आहे. फक्त काम करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे हे काम उभे राहू शकले.

जयदीप पाटील  (प्रमुख, मिशन नोबेल प्राइज चळवळ व विज्ञानगाव  प्रकल्प)