सोलापुरात आयुर्वेद महाविद्यालय चालविणा-या शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय विश्वस्त संस्थेतील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला असता यात संस्थेचे मानद सचिव दीपक आहेरकर यांची याचिका जिल्हा न्यायालयात मंजूर झाली आहे.
जुन्या फौजदार चावडीजवळ कार्यरत असलेल्या शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय विश्वस्त संस्थेतर्फे शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय चालविले जाते. यात आयुर्वेदाची पदवी (बीएएमएस) व पदव्युत्तर (एमडी) शिक्षण दिले जाते. आयुर्वेद शिक्षणात दर्जेदार संस्था म्हणून शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. तथापि, या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. प्रदीप नांदगावकर यांनी २००९-१० सालच्या शैक्षणिक वर्षांत एम.डी.ची प्रवेश प्रक्रिया राबवताना दीप्ती गोरे या विद्यार्थिनीची गुणवत्ता डावलून याच महाविद्यालयातील लिपिक शरद बुबणे यांच्या मुलाला प्रवेश दिला होता. याप्रकरणी शासनाने चौकशी करून प्राचार्य डॉ. नांदगावकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संस्थेच्या व्यवस्थापनाला दिले असता काही विश्वस्तांनी कारवाईस नकार दिला. त्यामुळे शासनाने संस्थेचा अल्पसंख्याकाचा दर्जा का काढून घेऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दरम्यान, संस्थेचे मानद सचिव दीपक आहेरकर यांनी प्राचार्य डॉ. नांदगावकर यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी भूमिका घेतल्यामुळे १ जून २०१२ रोजी आहेरकर यांनाच संस्थेतून काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती अरविंद दोशी व विश्वस्त प्रीतम दोशी यांनी ठराव करून आहेरकर यांना पदावरून काढून त्यांच्या जागेवर अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप कोठाडिया यांची निवड केल्याचे धर्मादाय आयुक्तांना कळविले होते.
या कारवाईच्या विरोधात आहेरकर यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेऊन न्यायालयाने आहेरकर यांची याचिका मंजूर केली व त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये तसेच तेच संस्थेचे मानद सचिव तथा विश्वस्तपदावर कामकाज पाहतील. त्यांना अडथळा आणू नये, असा आदेश दिला. याप्रकरणी आहेरकर यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन हबीब, अ‍ॅड. रमेश रोडगी व अ‍ॅड. पी. बी. लोंढे-पाटील यांनी काम पाहिले. तर दोशी व इतरांच्या वतीने अ‍ॅड. ए. डी. वसगडेकर यांनी बाजू मांडली.