उदगीर येथील लोणी सहकारी औद्योगिक वसाहतीत कोहिनूर डाळ मिलमध्ये कृषी विभाग व पोलिसांनी बुधवारी छापा टाकून सुमारे साडेसात हजार क्विंटल बियाणे जप्त केले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सोयाबीनवर कसलीही प्रक्रिया न करता अनमोल अॅग्रो सीड्स नावाने लेबल लावून ३० किलोच्या बॅगमध्ये हे बियाणे भरले जात होते. गेल्या २ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डाळ फुटाण्याचे व्यापारी गफार शेख यात गुंतल्याचे लक्षात आले होते. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. मध्य प्रदेशातील उज्जन येथील अनमोल अॅग्रो सीड्स कंपनीतील लोकांचा यातील संबंधही तपासला जात आहे. बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीनवर कसलीही प्रक्रिया न करता हे बियाणे लेबल लावून विकले जात होते. पंचायत समितीच्या गुणनियंत्रकांनी बियाण्यांची तपासणी करून त्यावर प्रक्रिया झाली नसल्याचे स्पष्ट केले.
सोयाबीनच्या पिशव्यांवर परीक्षण केलेले लेबल ९ मे २०१४चे लावले असले, तरी पॅकिंग मात्र २३ जुलैलाच केली जात होती. नांदेड, िहगोली, यवतमाळ आदी जिल्हय़ांतील कृषी अधिकारी व पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. बियाणे विक्री दुकानातून या बियाण्यांचा साठा जप्त केला जात आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांत पेरलेले सोयाबीन उगवले नाही, अशा हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे बियाणे किती प्रमाणात विकले गेले, याची माहिती घेऊन संबंधितांवर अधिक कडक गुन्हय़ाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले.