विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे पीक वाढणार आहे. यातील तण काढून चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याचे काम मतदारांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडय़ातील प्रचारास पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रारंभ झाला. घनसावंगी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे, उमेदवार राजेश टोपे यांची उपस्थिती होती. पवार यांनी भोकरदन व बदनापूर येथेही सभा घेतल्या. घनसावंगी येथील सभेत पवार यांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांवर प्रत्यक्ष टीका केली नाही वा महायुती तसेच आघाडी तुटल्याचा विषयही काढला नाही. मात्र, केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, कांदा-कापूस आदी निर्यातक्षम पिकांवरील अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. दुष्काळी स्थितीत सर्वात प्रथम जालना जिल्ह्य़ाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मोसंबी व अन्य फळबाग उत्पादकांना मदत केली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कामही केले. एखादा माणूस आमदार, खासदार व मंत्री झाल्यावर नामदार होतो. परंतु शेतकऱ्यांच्या माथी मात्र कायम थकबाकीदार असल्याचा शिक्का असतो. हा शिक्का मिटावा, यासाठी आपण कृषिमंत्री असताना प्रयत्न केले, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे पीक वाढणार असले, तरी योग्य व्यक्तींची निवड मतदार करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. उमेदवार टोपे यांनी मागील १५ वर्षांत घनसावंगी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.