पर्यटकांकडून मोबाइल वा कॅमेराद्वारे सेल्फी काढण्याच्या प्रकारांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, त्यामुळेच विविध पर्यटनस्थळी मोठय़ा प्रमाणावर अपघात होऊन प्रसंगी जीवितहानीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे अन्य पर्यटकांच्या पर्यटन आनंदावर विरजण पडते. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या प्रश्नावर सक्रिय झाले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानौटिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अलीकडेच पाठविलेल्या पत्रानुसार पर्यटकांमध्ये सेल्फीबाबत जनजागृती करण्यासाठी पर्यटनस्थळी माहिती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सेल्फीच्या नादात घडणारे अपघात टाळण्यासाठी पर्यटनस्थळी धोकादायक सेल्फीस्थळे शोधून संकेतस्थळे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहे. विविध पर्यटनस्थळी धोकादायक ठिकाणे शोधून जिल्हा प्रशासनाद्वारे सेल्फी प्रतिबंधक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्रासोबत सेल्फी जनजागृतीसाठी घोषवाक्यांची यादीही जोडून देण्यात आली आहे.
निसर्ग तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या व्यवस्थापनाचा विषय मागील दोन दशकांत बराच गांभीर्याने घेतला जात आहे. पूर, भूकंप, वीजप्रपात यांसारख्या नसíगक आपत्ती जुन्याच आहेत; परंतु विविध धार्मिकस्थळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अचानक आग लागणे, दहशतवादी हल्ले यातही लक्षणीय जीवितहानी झाली. मानवनिर्मित आपत्तीही गेल्या काही वर्षांत तीव्रतेने पुढे आल्या. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाचा विषयही ऐरणीवर आला. शासन स्तरावर तसेच प्रत्येक जिल्हास्तरावरही आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करणे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा उभारणे या निर्णयाची अंमलबजावणीही झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांकडून तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणांनाही प्रशिक्षण देऊन झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे.