विदर्भात प्लॅस्टिक तर कोकणात रासायनिक क्षेत्र उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केल्यानंतर शिवसेनेने प्रदूषणकारी रासायनिक उद्योग कोकणात उभारण्यास विरोध दर्शविला आहे. कोकणात रासायनिक विभागास शिवसेना विरोध करील, असे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. युतीतील दोन मित्रपक्षांमध्ये परस्परांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या प्रकल्पांमध्ये खो घालण्याची स्पर्धाच सुरू आहे.
नागपूरमध्ये झालेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांनी कोकणात रासायनिक क्षेत्र उभारण्याचे घोषणा केली. त्याची शिवसेनेमध्ये लगेच प्रतिक्रिया उमटली आहे. प्रदूषणाच्या मुद्दय़ावरच शिवसेना कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास विरोध करीत आहे. अशा वेळी आणखी रासायनिक विभाग उभारला गेल्यास शिवसेनेला राजकीयदृष्टय़ा अडचणी निर्माण होणार आहेत. चिपळूणजवळील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांचा अनुभव चांगला नाही. रसायनिक प्रकल्पांमुळे मच्छीमारीवर परिणाम झाला तसेच आसपासच्या परिसरात प्रदूषणाचा त्रास होतो. ही पाश्र्वभूमी असताना निसर्गरम्य कोकणात रासायनिक विभाग उभारण्याची आवश्यकताच नाही, असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकरिता केंद्रातील भाजप सरकार आग्रही आहे. अणुभट्टय़ा उभारण्याबाबत केंद्राने करारही केला आहे. अलीकडेच ‘पॉस्को’ या कोरियन कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पोलाद प्रकल्प संयुक्त भागीदारीत उभारण्याची घोषणा केली. पर्यावरणाच्या मुद्दय़ावर याच ‘पॉस्को’ प्रकल्पाला ओडिसा आणि कर्नाटकमध्ये विरोध झाला होता. मुख्यमंत्र्यांनी रासायनिक क्षेत्र उभारण्याची घोषणा करताना जागा १५ दिवसांत निश्चित केली जाईल, असे जाहीर केले आहे. अशा मोठय़ा प्रकल्पांमुळे कोकणाचे पर्यावरण संतुलन बिघडेल, अशी भीती खासदार राऊत यांनी व्यक्त केली. कोकणातील १५ पैकी शिवसेनेचे सात आमदार निवडून आले तर दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याउलट कोकणात भाजपचा एकच आमदार निवडून आला. ही राजकीय पाश्र्वभूमी लक्षात घेता स्थानिकांची नाराजी ओढवून घेणे शिवसेनेला शक्य होणार नाही.
कुरघोडीचे राजकारण
’मुंबईत रात्रजीवनाच्या आदित्य ठाकरे यांच्या योजनेस भाजपचा मोडता.
’गच्चीवर हॉटेल्स उभारण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपचा विरोध.
’मरिन ड्राइव्हवर एलईडी दिवे लावण्याच्या भाजपच्या निर्णयाला सेनेचा आक्षेप.
’डहाणूजवळ वाढवण येथे मोठे बंदर उभारण्यास भाजपचा पुढाकार, तर शिवसेनेचा विरोध.
’जैतापूरला शिवसेनेचा विरोध कायम, केंद्रातील भाजप सरकारचे विरोधाकडे दुर्लक्ष
’शिवसेनेकडील आरोग्य खात्यातील काही बदलांचे प्रस्ताव मुख्यमंत्री खात्यात मंजुरीसाठी रखडले.
’शेतकरी कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली.