लांजा तालुक्यातील एका शिक्षिकेच्या बदलीचा मुद्दा सेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रतिष्ठेचा केल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये संघर्षांची ठिणगी पडली आहे. या प्रकारची पाश्र्वभूमीवर अशी – लांजा तालुका समुपदेशन प्रक्रियेत अन्याय झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडे दाद मागून एका शिक्षिकेने पाहिजे असलेली शाळा मिळविली. त्याला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यासाठी आमदार राजन साळवी यांनी सोमवारी आक्रमक होत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लक्ष्य केले. तर भाजपचे उपाध्यक्ष सतीश\ शेवडे यांनी शिक्षिकेची बदली रद्द करू नये, अशी भूमिका घेत त्याला छेद दिला आहे. त्या शिक्षिकेवरून रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत.    लांजा पंचायत समितीचे समुपदेशन महिन्याभरापूर्वी झाले. शिक्षिका सुषमा पाटोळे यांनी पती-पत्नी एकत्रीकरणात अर्ज दिला होता; मात्र शासकीय नियमात बसत नसल्याचे कारण देत त्यांचे नाव समुपदेशन यादीतून नवव्या क्रमांकावर आले.  या प्रक्रियेत त्यांना सापुचेतळे शाळा मिळाली; मात्र त्याला आक्षेप घेत पाटोळे यांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती ‘बागेश्री’ शाळेत झाली. समुपदेशनातील शाळेत रुजू झाल्यानंतर पाटोळे यांनी पुढील पावले उचलली पाहिजे होती, असा पवित्रा पंचायत समितीने घेतला. त्यांनी सापुचेतळे शाळेत रुजू झालेच पाहिजे, असा ठरावही पंचायत समितीच्या सभेत केला; मात्र त्यांच्या निर्णयाला जिल्हा परिषद प्रशासनाने केराची टोपली दाखविली. प्रशासनाकडून पंचायत समितीचे म्हणणे दुर्लक्षित झाल्याने अखेर सोमवारी शिवसनिक आक्रमक झाले. आजारी असलेले आमदार राजन साळवी यांनी सोमवारी सकाळी शिवसनिकांसह जिल्हा परिषदेवर धडक दिली होती. हा प्रश्न सोडविला नाही तर मी स्वत: उपोषणाला बसेन, असा इशारा साळवींनी दिला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्य असल्याचा दाखला दिला. तसेच पती-पत्नी एकत्रीकरणाचा दाखला बोगस असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन या वेळी दिले.    शिवसेनेने एकीकडे आंदोलनाचा पवित्रा घेतला असतानाच भाजपने त्या शिक्षिकेला पाहिजे तेथे शाळा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. भाजपतर्फे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी बाजू मांडली. पाटोळे यांच्यावर अन्याय झाला आहे.

त्यांचा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मांडला होता. त्यानंतरच झालेल्या चौकशीत समुपदेशन यादीतच त्या शिक्षिकेवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून कार्यवाही करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लांजा तालुक्यातील बागेश्री या शाळेत तात्पुरती नियुक्ती केली आहे.

याचा पाठपुरावा स्वत: शिक्षण सचिव करत आहेत. सध्या पाटोळे यांची केलेली नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रद्द करता येणार नाही, असेही स्पष्ट केले. शिवसेना-भाजपकडून शिक्षिकेच्या बदलीचा विषय प्रतिष्ठेचा बनविण्यात आला आहे. शिवसेनेकडून पंचायत समितीने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेची पाठ धरली आहे. तर पंचायत समितीमध्ये चुकीची प्रक्रिया झाल्याचे कारण देत भाजपने त्या शिक्षिकेच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.