सत्तेत सहभागी झाल्यानंतर तू मला अडवणारा होतो कोण, अशा अविर्भावात शिवसेनेचे कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यातच एका पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याने या आमदाराविरुध्द रात्री उशिरा पोलिसाता गुन्हा दाखर करण्यात आला. बुधवारी हॉटेल प्राईड परिसरात हा प्रकार घडला.
आमदार, निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार, मंत्री आणि जिल्हाध्यक्षांना भेटण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दुपारी नागपुरात आले. हॉटेल प्राईडसमोर मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांंची गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
केवळ आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक असल्यामुळे सामान्य शिवसैनिकांनी आत येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्यामुळे जागोजागी पोलीस सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. बैठक सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते हॉटेलमध्ये ठाण मांडून होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या खोलीत गेल्यावर आत कोणालाही सोडू नका, असे फर्मान शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिसांना दिले. ज्या खोलीत उद्धव ठाकरे थांबले होते त्या खोलीबाहेर एक पोलीस उपनिरीक्षक उभा होता. तो पक्षनेत्यांच्या आदेशानुसार कोणालाही आत सोडत नव्हता. तेवढय़ात  आमदार जाधव उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना त्या या पोलीस अधिकाऱ्याने अडविले. ‘तू मला अडवणारा कोण होतो’, अशा अविर्भावात जाधव यांनी त्यांच्याशी प्रारंभी वादावादी केली आणि त्यानंतर आमदारकी दाखवत या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. आमदार जाधव उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर निघाले.
 या संदर्भात आमदार जाधव यांच्याशी काही प्रसार माध्यमांनी संपर्क साधला. मात्र, त्यांनी असे काहीच घडले नसल्याचे सांगितले. सोनेगाव पोलिसांनीही अशी कुठलीच घटना घडली नसल्याचे सांगितले. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विचारल्यावर त्यांनी या घटनेला दुजोरा दिला, पण काय घडले ते माहिती नसल्याचे सांगितले. जाधव यांनी यापूर्वी मनसेमध्ये असताना औरंगाबादेत एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना आहे.