शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा (नॅशनल हिरो) दर्जा देण्यात यावा आणि त्यांचे छायाचित्र सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंत यांनी पत्र लिहिले असून, त्यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विकासात बाळासाहेब ठाकरे यांचे अमूल्य योगदान आहे. मराठी माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेगळ्या राज्याची निर्मिती झाल्यानंतरही महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता. त्यामुळेच मराठी माणसाला त्याचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थापना केली. या माध्यमातून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले, असे सावंत यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.
मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण पद्धती, आर्थिक विकास यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. सत्तेची आस न बाळगता ते अत्यंत साधे आयुष्य जगले, असेही सावंत यांनी लिहिले आहे. त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व म्हणून जाहीर करावे आणि त्यांचे छायाचित्र सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली.