पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ात भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. टंचाई कालावधीत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम शुक्रवारी (दि. ४) औरंगाबाद येथे येणार आहेत. मराठवाडय़ात केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ७६ पैकी ७४ तालुक्यांत पेरण्या रखडल्या आहेत. ४२१ गावे व २७२ वाडय़ांना ५७२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अजूनही टँकरसाठी आवश्यक तो निधी मिळाला नाही.
औरंगाबाद जिल्ह्य़ात टँकर व विहीर अधिग्रहणावर ११ कोटी रुपये खर्च झाला असून, तो न मिळाल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पाणीपुरवठय़ाच्या विविध योजनांसाठी ५ कोटींचा निधी मागण्यात आला. जिल्ह्य़ातील १८६ गावांना २७२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बहुतांशी धरणातील पाणीसाठे संपत आले असल्याने टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडय़ातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, पाणीपुरवठा योजनांचे मुख्य अभियंता, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त, महापालिका आयुक्त आदींनी या बैठकीत उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.