राज्य आणि देशपातळीवरील शरद पवारांचा एकुणच वकुब पाहता त्यांच्यासमोरच त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस आजमितीला महाराष्ट्रातील फारच थोड्या नेत्यांमध्ये असेल. मात्र, रविवारी नांदेडमधील एका जाहीर कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी कोणतीही भीड न बाळगता थेट पवारांवर हल्ला चढवला.  शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार माणसे फोडण्यात अत्यंत कुशल आहेत. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करु शकत नाही. पवार म्हणजे बिना चिपळ्यांचे नारदच आहेत, असे जाहीर टीकास्त्र त्यांनी व्यासपीठावरून सोडले.

विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सुरूवातीला केशवराव धोंडगे यांनी थेट व्यासपीठावरच शरद पवारांचा मुका घेतला. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या कारणांमुळे हा कार्यक्रम सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. केशवराव धोंडगे यांनी मुका घेतल्यानंतर पवारांनीही आपल्या भाषणात मिष्किलपणे प्रतिक्रिया दिली. बरं झालं त्यांनी जाहीर कार्यक्रमात मुका घेतला. मला घरी सांगता तर येईल ते केशव धोंडगेच होते. अन्यथा पंचाईत झाली असती, असे पवारांनी सांगताच लोकांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला. नांदेड विद्यापीठातर्फे शरद पवार यांना मानद डी लिट पदवी देवून सन्मानित करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, पवारांचा हा सत्कार सोहळा केशवराव धोंडगे यांच्या चौफेर फटकेबाजीमुळेच अधिक गाजला.  पवारांमध्ये किती आणि कोणते अवगुण आहेत हे त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते. मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्याच्या मागणीसाठी शरद पवारांनी फिरवाफिरवी केली. पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते त्यांनाही पवारांनी बुडवले. आणीबाणीच्या काळात पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्रा बदलले असते. पण पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पवार सत्तेला चिकटून बसले, असा हल्लाबोल केशवराव धोंडगे यांनी पवारांच्या उपस्थितीत केला. पवारांना एवढ्या डिलीट पदव्या  मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का, असा टोमणाही धोंडगेंनी यावेळी लगावला.

BJP may bench prominent leaders
भाजपा पूनम महाजन यांचं तिकीट कापणार? बृजभूषण सिंह, जामयांग नामग्यालही रांगेत.. नेमकं घडतंय काय?
Uddhav Thackeray On BJP and Shinde group
उद्धव ठाकरेंची भाजपा आणि शिंदे गटावर टीका; म्हणाले, “थापाड्यांची खोटारड्यांची लंका…”
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्तिलढय़ातील कृतिशील नेतृत्व, त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान तसेच मराठवाडय़ात शैक्षणिक संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याची अत्यंत कृतज्ञपणे नोंद घेतली. शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांना राष्ट्रहितासाठी प्रेरित करून इतिहास कसा घडवावा, याचा आदर्श स्वामी रामानंद तीर्थ यांनी घालून दिल्याचे गौरवोद्गार पवार यांनी पदवी स्वीकारताना काढले.