बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठू न शकलेल्या भाजपने शिवसेनेशी हातमिळवणी केली तरी आणि राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेतला तरी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवावा लागेल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
राज्यात प्रभाव ठेवणारे अनेक राजकीय पक्ष असले तरी आजवर केवळ भाजपने जाहीरपणे स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार केला आहे. आजवर भाजप व सेनेची युती राज्यात असल्याने भाजपला हा मुद्दा पुढे रेटता येत नव्हता. या वेळी युती तुटल्याने भाजप आता स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा समोर करेल, असा कयास होता. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात शिवसेनेने याच मुद्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपला संपूर्ण राज्यात यश मिळवायचे असल्याने,‘महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही,’ अशी भूमिका जाहीर करावी लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अखंड महाराष्ट्राची भाषा बोलावी लागली. भाजपला निवडणूक जाहीरनाम्यातसुद्धा विदर्भाच्या मुद्याचा समावेश करण्यात आला नाही. तरीही भाजपचे नेते एकदा स्वबळावर सत्ता आली की, विदर्भ स्वतंत्र करूच, अशी भाषा प्रचाराच्या काळात बोलत राहिले. आता भाजपला पूर्ण बहुमत नाही, हे स्पष्ट झाल्याने सेना याच मुद्यावरून भाजपची पुन्हा कोंडी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपची पहिला पसंती सेना राहणार, हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. हे लक्षात येताच सेनेच्या नेत्यांनी,‘महाराष्ट्राचे तुकडे पाडणार नाही, अशी हमी देणाऱ्या पक्षाला मदत करू,’ अशी भूमिका घेणे सुरू केले आहे. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी असाच सूर लावला. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सेनेशी बोलणी करताना भाजपला विदर्भाच्या मुद्यावर काय करायचे, यावर आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. आता राष्ट्रवादीनेसुद्धा भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. आजवर स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतानासुद्धा विदर्भाच्या मुद्यावर भाजपची अडचण होणार आहे. सत्तास्थापनेसाठी वेगळ्या विदर्भाच्या मुद्याचा बळी दिला तर विदर्भात भाजपची अडचण होणार आहे. या वेळी विदर्भाने भाजपच्या पदरात भरभरून यश टाकले आहे. एकीकडे हे ऐतिहासिक यश व दुसरीकडे सत्ता, अशा कात्रीत भाजपचे नेते आता अडकले आहेत. परिणामी, सेनेशी नव्याने घरोबा करताना भाजप या मुद्याचा बळी देणार की, यातून मार्ग काढणार, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सध्या तरी सत्ता स्थापना महत्त्वाचे, विदर्भाचे नंतर बघू, अशीच भूमिका भाजप घेण्याची शक्यता आहे.

‘विदर्भाचा मुद्दा भाजप सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सेनेशी अजून चर्चाच सुरू व्हायची आहे. चर्चेत जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा बघू.
– भाजप नेते सुधीर मुनगंटीवार