अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने प्रतीक पांडुरंग आतकर (वय २१, रा. आलमगीर, भिंगार) याला १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यातील इतर दोन आरोपींची, प्रतीकच्या मित्रांची, गुन्हय़ास मदत केल्याच्या आरोपातून मुक्तता करण्यात आली.
जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी या खटल्याचा निकाल आज, गुरुवारी दिला. सरकारतर्फे सरकारी वकील गोरक्ष मुसळे यांनी काम पाहिले. सोएब अरिफ खान (मुकुंदनगर) व हमीद पठाण (कोठला) या दोघांची मुक्तता करण्यात आली. प्रतीक आतकरला भादंवि कलम ३७६ व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ नुसार प्रत्येकी १० वर्षे व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली.
चौदा वर्षांची अल्पवयीन मुलगी कोठला भागात मोबाइल रिचार्ज करण्यासाठी दुकानात जात असताना, २१ डिसेंबर २०१२च्या दुपारी तेथे मोटारसायकलवर आलेल्या प्रतीक आतकरने तिच्या वडील व भावांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिला विळद येथे व नंतर रेल्वेने श्रीरामपूर येथे नेले. तेथे मित्रांना बोलावून घेऊन, त्यांच्या मदतीने तवेरा गाडीतून बारामती, इंदापूर येथे नेले व तिच्यावर अत्याचार केले. मुलीने नगरला परतल्यावर तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. मुलीच्या वडिलांनी प्रतीकच्या वडिलांकडून एक लाख रुपये घेतले होते. ते परत न दिल्याने फसवणूक झाल्याची फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात दि. २५ रोजी गेला होता, परंतु आमची फिर्याद न घेता मुलीच्या वडिलांची खोटी फिर्याद घेण्यात आली, असा बचाव प्रतीकच्या वकिलांनी केला. तो न्यायालयाने फेटाळला.