जयंत पाटील यांची राजकीय कोंडी करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न आज काही प्रमाणात यशस्वी ठरले. शिवसेनेचे भीमराव माने आणि प्रमुख विरोधक अपक्ष नानासाहेब महाडिक यांनी माघार घेतली असली, तरी जयंत पाटील यांच्या विरुद्ध पाच प्रमुख उमेदवारांसह १३ जण रिंगणात उरले आहेत. जिल्ह्यातील आठही मतदार संघात बहुरंगी लढती होत असून सांगली व मिरज या ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा जिल्ह्यातील अन्य मतदार संघांमध्ये होणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना त्यांच्याच इस्लामपूर मतदार संघामध्ये कडवे आव्हान देण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता. दोघांतील चच्रेनुसार अभिजित पाटील हे सर्व पक्षीय उमेदवार निश्चित करण्यात आले होते.
तथापि, उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सेनेचे भीमराव माने आणि अपक्ष म्हणून मदानात उतरलेले नानासाहेब महाडिक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तथापि, स्वाभिमानीचे बंडखोर बी. जी. काका पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, मनसेचे उदयसिंह पाटील बसपाचे महावीर कांबळे, रघुनाथ पाटील समर्थक शेतकरी संघटनेचे विलास रकटे यांच्यासह १३ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. मत विभागणी टाळण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न शेवटच्या क्षणी निष्फळ ठरले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील आठ मतदार संघांमध्ये बहुसंख्य उमेदवार उरल्याने प्रत्येक मतदार संघामध्ये बहुरंगी लढती होत आहेत. सांगलीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष मुन्ना कुरणे आणि प्रदेश समितीचे माजी सरचिटणीस दिगंबर जाधव यांनी बंडखोरी केली असून मिरजेत सी. आर. सांगलीकर यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे आपला उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केली आहे. सांगली मतदार संघामध्ये १९ आणि मिरज मतदार संघात १७ उमेदवार रिंगणात उरले आहेत.