संचालक मंडळाची मुदत  संपलेल्या  रायगड जिल्ह्य़ातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे या समित्यांच्या बाजाराला आता चाप लागला आहे. रायगड जिल्ह्य़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्या सर्व बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार रायगड जिल्ह्य़ातील पेण, अलिबाग, महाड, माणगाव, मुरुड, कर्जत व रोहा या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.
शेतकऱ्याचा माल थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, व्यापारी, हमाल, तोलारी यांना एकत्र आणणे अशी कामे या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत केली जातात. शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा संबंध येतो. राजकीय दृष्टय़ा या समित्या महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या बाजार समित्या आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी राजकीय पुढारी प्रयत्न करतात.
रायगड जिल्ह्य़ात कृषी उत्पन्न बाजार सामित्यांवार शेकापचे वर्चस्व आहे. पंधरा तालुक्यांमध्ये ९ कृषी उत्पन्न बाजार सामित्या आहेत. त्यावर शेकापचे वर्चस्व आहे. काही समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपून त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांना पुन्हा मुदतवाढ न देता तेथे निवडणुका घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.