महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मनोज संदीपान उगले (सिमुरगव्हाण) यास ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकुलिका एस. जवळकर यांनी सुनावली.
सिमुरगव्हाण येथील या महिलेचा पती २५ फेबुवारी २०१० रोजी ऑटो दुरुस्तीसाठी पाथरी येथे गेला होता. पीडित महिला शेतात काम करण्यास गेली होती. सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान शेतातून घरी परतत असताना आरोपी मनोज उगले याने विळ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व बाजूस असलेल्या उगले यांच्या शेतातील केळीच्या मळ्यात नेऊन या महिलेवर बलात्कार केला. संबंधित महिलेने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर पाथरी पोलिसांत आरोपी मनोज उगले याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यू. के. टाक यांनी तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे ९ साक्ष नोंदविण्यात आल्या.
महिलेचा जबाब व परिस्थितीजन्य पुरावा गृहीत धरून न्यायधीश श्रीमती जवळकर यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात ७ वष्रे सक्तमजुरी, २० हजार दंड व दंड न भरल्यास ७ महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सुभाषराव देशमुख हट्टेकर यांनी काम पाहिले.