शनिशिंगणापूरमध्ये स्थानिक महिलांना अद्यापही चौथऱ्यावर जाण्यास भीती

लिंगभेद व विषमतेच्या परंपरेवर हल्ला करून महिलांनी शनििशगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) येथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क एक वर्षांपूर्वी मिळविला खरा; स्थानिक महिला चौथऱ्यावर जाण्याचे टाळत आहेत. महिलांचे अद्यापही प्रबोधन झाले नसल्याने जुन्या रूढी व प्रथांचे जोखड त्या झुगारून द्यायला अद्याप  तयार नाहीत. अजूनही या महिला शनिदेवाचे दर्शन खालूनच घेत आहेत.

महिलांना शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची चारशे वर्षांपासून बंदी होती. २८ नोव्हेंबर २०१५ रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन िलगभेदावर आधारित दर्शनाची परंपरा मोडीत काढली. त्याने मोठे वादळ उठले. गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन निषेध केला. शनिदेवाच्या शिळेला दुधाचा अभिषेक करून मंत्रोपचार करून कथित शुद्धी करण्यात आली. विश्वस्त मंडळाने सात सुरक्षारक्षकांना निलंबित केले. चौथऱ्यावर कुणी जाऊ नये म्हणून चहूबाजूने लोखंडी कठडे उभारले. बंदोबस्तासाठी महिला व पुरुष सुरक्षारक्षकांचा पहारा वाढविला होता.

भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलन केले. त्याला गावकऱ्यांनी विरोध केला. ब्रिगेडच्या महिलांना रोखण्यासाठी गावातील महिला सज्ज झाल्या. परंपरावादी व विरोधी असे महिलांमध्ये दोन गट पडले. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ या उच्च न्यायालयात गेल्या. न्यायालयाने मंदिरांमध्ये महिलांना पुरुषांबरोबरीने प्रवेश व दर्शन घेण्याचा हक्क मान्य केला. सरकारनेही चौथऱ्यावर जाऊन शनीदर्शन घेण्यास बंदी घालता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने विश्वस्तांना दिला. अध्यक्ष अनिता शेटे व विश्वस्त शालिनी लांडे यांनी सरकारी आदेशाला विरोध केला.

पूर्वी पुरुष हे ओले वस्त्र नेसून दर्शनासाठी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेत व तेल वाहत असत. पण संस्थानाने २०११ पासून त्यालाही बंदी केली होती. केवळ श्रावण महिन्यात ती परवानगी देण्यात आली होती. महिलांच्या आंदोलनामुळे तेदेखील बंद करण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी गावकरी व परिसरातील हजारो भाविक हे गंगेचे प्रवरासंगम येथून पायी कवाडीने पाणी आणून ते शनिदेवाला घालतात. गेल्या वर्षी त्यांना चौथऱ्यावर जाऊन पाणी घालण्यास संस्थानने महिला आंदोलनाची धास्ती घेऊन बंदी केली होती. मात्र कावडीवाल्यांनी बंदी नाकारून वर जाऊन पाणी घातले. त्यामुळे विश्वस्तांनी सर्वाना वर जाण्यास परवानगी दिली. भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी महिलांसह येऊन शनीला अभिषेक करून दर्शन घेतले. आता महिला चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतात, पण गावकरी महिला मात्र खालूनच दर्शन घेत आहेत.

संस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे व विश्वस्त शालिनी लांडे यांनीदेखील अजून चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलेले नाही. आम्हीच काय पण जिल्ह्य़ातील कोणी महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलेले नाही, असे विश्वस्त महिलांचे म्हणणे आहे. बाहेरून आलेल्या महिला त्यांना माहीत नसल्याने चौथऱ्यावर जाऊन घेतात, पण त्यांची संख्या ही अवघी २५ टक्के असल्याचे उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी सांगितले. परंपरेचे जोखड झुगारून देणाऱ्या महिलांची संख्या कमीच आहे.

८ एप्रिलला महिलांचा आनंदोत्सव

महिलांना पाडव्याच्या दिवशी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार मिळाला असला तरी तिथीनुसार नव्हे तर तारखेनुसार ८ एप्रिल रोजी भूमाताच्या महिला शनििशगणापूर येथे येऊन आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. गावातील महिलांनी परंपरेचे जोखड झुगारून द्यावे, त्यासाठी भूमाता प्रबोधन करणार आहे असे त्यांनी सांगितले.

शनिदेवापासून महिला दूरच

चौथऱ्यावर जाण्यास जरी परवानगी मिळाली असली तरी त्यांना शनीच्या शिळेला हात लावून दर्शन घेता येत नाही. शनीच्या शिळेभोवती लोखंडी कठडे बसविण्यात आले आहे, त्यामुळे शिळेला हात लावून दर्शन घेता येत नाही. केवळ पुजारी व आरती करणाऱ्यांनाच असे दर्शन घेता येते. त्यासाठी सुरक्षा व मूर्तीची झीज ही कारणे देवस्थान देत आहे.