सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी भांडखोर नेत्यांना बाजूला ठेवून नव्या मंडळींना संधी देण्याचा आदेश दिला. यात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह पालिका गटनेते दिलीप कोल्हे व माजी शहराध्यक्ष कय्युम बुऱ्हाण यांना झटका बसल्याचे व स्वत: पवार यांनीच त्यांचा ‘बंदोबस्त’ केल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या सोलापुरात पालकमंत्री म्हणून शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने आपली राजकीय वाटचाल विकसित केली व स्वत:ची ताकद वाढविली, त्याच सोलापुरात त्यांच्या राष्ट्रवादीला गटबाजीने पुरते ग्रासले आहे. लाथाळ्या व राष्ट्रवादी असे जणू समीकरणच येथे तयार झाले आहे. त्यामुळे पक्षाची वाढ खुंटली आहे. स्थानिक नेते मात्र ‘गब्बर’ झाले आहेत. पक्षाचे शहराध्यक्षपदाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर असेल, त्याच्या विरोधात अन्य मंडळी एकत्र येऊन त्यास पक्षाचे काम करू देत नाहीत, ही बाब आता नित्याची झाली आहे.  अलीकडे शहरात पक्षाचे नेते अजित पवार यांनी लक्ष घातले तरी गटबाजी व भांडणे कायमच राहिली. किंबहुना, शरद पवार यांनीही संबंधितांना शिस्तीने वागण्यास सुनावले तरी त्याचा परिणाम झाला नाही. उलट, ‘पवार इज पॉवर’ असा धोशा लावत आपणच पवारनिष्ठ आहोत, असा दावा बहुसंख्य नेते करताना एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याचे विसरत नाहीत. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या  महापालिका निवडणुकीत पक्षाचा आणखी फटका बसण्याची भीती व्यक्त होत असतानाच अखेर पक्षांतर्गत भांडणे पुन्हा शरद पवार यांच्या निदर्शनास आली. बारामती मुक्कामी पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी तसा स्पष्ट अहवालच पवार यांना सादर केला. तेव्हा पवार यांनी, भांडणे करणाऱ्या मंडळींना पक्षात स्थान द्यायचेच कशाला, असा सवाल करीत, या भांडखोर मंडळींना दूर ठेवून दुसरी फळी तयार करण्याच्या सूचना दिल्या. पवार यांनी ही झाडाझडती घेताना संबंधित भांडखोर नेते तेथे प्रत्यक्ष हजर होते. त्यांना जोरदार चपराक बसली.

पवार यांच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत पवार यांच्याच सूचनेनुसार पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील व उपमहापौर प्रवीण डोंगरे यांचा समावेश करण्यात आला. गादेकर हे विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांना समितीत स्थान देण्यात आले. विशेषत: माजी शहराध्यक्ष शंकर पाटील व उपमहापौर प्रवीण डोंगरे यांची लागलेली वर्णी पक्षातील प्रस्थापितांना धक्का देणारी असल्याचे मानले जाते.