शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यामागे राष्ट्रवादीची होत असलेली पीछेहाट आणि पवार यांचा कमी होत असलेला प्रभाव कारणीभूत आहे की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

या सोहळय़ाची गेले अनेक दिवस राज्यभर चर्चा होती. दरम्यान प्रत्यक्ष सोहळ्यावेळी खूपच कमी नेत्यांची उपस्थिती होती. शेकापचे नेते गणपतराव देशमुख, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार झाला. या वेळी पवार वगळता अन्य नेत्यांच्या भाषणातही फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे खूप गाजावाजा झालेला हा कार्यक्रम अगदीच स्थानिक स्वरूपाचा झाला.

खरे पाहता हा सत्कार सोहळा गेल्या फेब्रुवारीतच सर्वप्रथम सोलापुरात ठरलेला होता; परंतु महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत या सत्काराला विलंब झाला. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी हेदेखील या समारंभास येणार होते; परंतु त्यांनी ऐन वेळी काही अपरिहार्य कारणांमुळे येणार नसल्याचे संयोजकांना कळविले. अन्य नेते मंडळींना या समारंभासाठी सोलापुरात न यायला ऐन वेळी कोणत्या अडचणी होत्या, हे स्पष्ट झाले नाही.

शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांचा नागरी सत्कार सोहळा होतो आणि त्याकडे पाहुणे म्हणून ठरलेल्या प्रमुख नेत्यांनी ऐन वेळी पाठ फिरवावी, यात पवार यांचा दबदबा संपला म्हणायचा की सत्कार सोहळ्याच्या नियोजनातील उणीव म्हणायची, यावर प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळत आहे. अलीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने हाराकिरी करीत भाजपपुरस्कृत महाआघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे सोपविली आहे. पक्षातील बेदिलीचीही छाप या सोहळय़ावर होती. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्यांचे कमी झालेले महत्त्व, पक्षाचे संकुचित झालेले अस्तित्व या साऱ्या बदलत्या परिस्थितीमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक नेत्यांनी या सोहळय़ाकडे पाठ फिरवली की काय, अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे.