माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले लिखित ‘थोडी ओली पाने’ या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धैर्यशीलराव पवार यांचे पंडित नेहरू यांच्यासमवेत असलेल्या छायाचित्राचे अनावरण, बॉलिंग मशीनचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ४.३० वाजता अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.
आ. टकले यांच्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सायंकाळी सहा वाजता सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स येथे होणार आहे. याप्रसंगी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, डॉ. जब्बार पटेल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्यापूर्वी दुपारी साडेचार वाजता पवार यांच्या हस्ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष धैर्यशीलराव पवार यांच्या छायाचित्राचे व बॉलिंग मशीनचे अनावरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के राहणार आहेत. कार्यक्रमास क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांनी केले आहे.