विविध सवलतींपोटी राज्य शासनाकडून येणे असलेली १७०० कोटींची थकबाकी एसटी महामंडळाला टप्प्या-टप्प्याने अदा करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याबरोबरच सर्वसामान्य माणसाचा एसटी बसमधील प्रवास सुखकर व्हावा, तसेच कामगारांच्या वेतनवाढीबाबत निर्माण झालेली कोंडी शंभर टक्के सोडविण्यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे नि:संदिग्ध आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
उद्यमनगर येथील चंपक मैदानावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटणीस हनुमंतराव ताटे, महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव, आमदार उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत, सहसचिव दीपक बागडे, कोषाध्यक्ष संदीप भोंगले, विजयराव जाधव, शिरगांव ग्रामपंचायत सरपंच रज्जाक काझी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहणानंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून दीपप्रज्वलन तसेच स्वर्गीय भाऊ फाटक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पवार आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, राज्याच्या खजिन्यावर करोडो रुपयांचा बोजा असून यंदा पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सरकार आर्थिक अडचणीत सापडलेले आहे, ही वस्तुस्थिती असून यासाठीच महामंडळात भांडवली गुंतवणूक करून त्याला गतवैभव मिळवून देता येईल. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या हितासाठी कार्यरत असून सुमारे ६५ ते ७० टक्के कामगार या संघटनेचे सभासद आहेत. संघटनेवरील कामगारांचा विश्वास वाढत असल्याने इतरांनी थाटलेली दुकाने बंद होतील. कारण त्या दुकानांमधील माल विकाऊ नसून तो दिखाऊ असल्याची टीकाही पवार यांनी करतानाच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले कामगार-सभासद या संघटनेची लोकप्रियता दाखवून देतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना एसटी बसच्या सवलती जाहीर करून राज्य सरकार दानधर्म केल्याचा आव आणत पुण्य पदरात पाडून घेत आहे. पण पैशासाठी मात्र दुसऱ्याच्या खिशात हात घालते, हे काय बरे वाटत नाही, असा टोला हाणतानाच विविध सवलतींपोटी सरकारकडून येणे असलेली थकबाकी महामंडळाला मिळवून देण्याबाबत तसेच कामगारांच्या वेतनवाढीची कोंडी सोडविण्याबाबत आपण स्वत: पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. ही कोंडी शंभर टक्के फुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवशांना तसेच स्त्रियांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
.. महामंडळाला प्रतिष्ठा लाभेल -गोरे
या वेळी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी एसटीच्या सर्वच कामगारांच्या न्याय्य मागण्यांशी महामंडळ सहमत आहे. त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे स्पष्ट केले. एसटीला गतवैभव आणि प्रतिष्टा प्राप्त व्हावी यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतीनिधींनी महिन्यातून किमान १५० कि.मी.चा प्रवास एसटी बसमधून करण्याची नितांत गरज आहे. राज्यातील अनेक बसस्थानकांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून गेल्या ३०-४० वर्षांत त्यांची डागडुजीही झालेली नाही. तेथील स्वच्छतागृह व बसगाडय़ांची स्थितीही नाजूक बनली आहे आणि म्हणूनच सर्वच लोकप्रतिनिधींनी एसटी बसमधून प्रवास केल्यास महामंडळालाही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे गोरे म्हणाले.
कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी आपल्या प्रास्ताविकात कामगारांच्या वेतनवाढीची कोंडी लवकरात लवकर फुटावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी कामगारांच्या वेतनवाढीसह महागाई भत्ता वाढवून देण्याबाबत महामंडळ व सरकारने प्राधान्याने विचार करावा. कामगारांना विश्वासात घेतल्यास व त्यांच्या मागण्या मान्य केल्यास महामंडळ कधीच तोटय़ात जाणार नाही, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
या वेळी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव, आमदार उदय सामंत यांचीही समायोचित भाषणे झाली. रत्नागिरीचे विभागीय सचिव शेखर सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्त झाले. या अधिवेशनाला राज्यभरातून संघटनेचे सुमारे ३० हजारांपेक्षाही जास्त सभासद कामगार उपस्थित होते.