एकनाथ खडसेंच्या शेतक ऱ्यांबद्दलच्या विधानावर मी कशाला बोलू असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या विषयाला बगल दिली. तसेच भाजपसमवेत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास सुंठीवाचून खोकला गेला असेच म्हणावे लागेल, अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार येथे आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.  
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांकडे मोबाईलचे बिल भरायला पैसे आहेत. मग, विजेचे बिल ते का भरत नाहीत अशा केलेल्या वक्तव्याबाबत आज पत्रकारांनी पवारांना विचारणा केली. यावर पवारांनी ‘मी याबाबत कशाला रिअ‍ॅक्शन देऊ’ असे उलट प्रश्न करत अधिक बोलण्याचे टाळले. परंतु या मुद्दय़ाला धरून मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी स्थितीबाबत राज्यकर्त्यांकडून कोणतेही निर्णय झाले नसल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी, आपण याबाबत जबाबदार व्यक्तींशी अद्याप बोललेलो नाही. पण, पिण्याचे पाणी, पशुधन व वीज बिल कपातीसह सवलती दिल्या गेल्या पाहिजेत, दुष्काळाची झळ डिसेंबरनंतर खऱ्याअर्थाने बसते. त्यानंतरच ठोस निर्णय होत असतात असे त्यांनी नमूद केले. यासाठी केंद्राची मदत मिळवण्याची प्रक्रिया आहे. राज्य शासनाने मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवायचा असतो. त्याची गरज ओळखून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या या विषयीच्या विशेष विभागाकडून पाहणी करण्यासाठी येते आणि त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून मदतीचा निर्णय होत असतो. पण, राज्य शासनाने मदत मिळण्यासाठी केंद्राकडे अजून प्रस्तावच पाठवलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊसदराबाबत पवारांना छेडले असता त्यांनी, उसाच्या दरासाठी आंदोलने करणारेच आज सत्तेत असल्याने चांगला दर मिळायला हरकत नाही. २,७०० पासून साडेतीन हजारावर ऊसदराची यांनीच मागणी केली आहे.
त्यांचीच राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने त्यांच्या मागणीनुसार ऊसदरासाठी कारखान्यांकडे पैसे नसतील तर अभ्यास समिती नेमून त्यांना उसाला किमान २,७०० रुपयांची पहिली उचल देण्यास हरकत नसावी, गळीत हंगामापूर्वी साखरेचे दर पाडले जात असल्याची ओरड निर्थक असून, साखर उत्पन्न वाढले की दर कमी होतात. सध्यातर जगात साखरेचे दर कोसळले आहेत. जगातील साखरेचे भाव पाडण्याची ताकद कोणाच्यातच नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.