आमीर खानने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आपले मत मांडल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने विरोध केला जात आहे. त्याला देश सोडून जाण्यास सांगितले जात आहे. हीच तर असहिष्णुता असल्याचे सांगत देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमीरविरोधकांना बुधवारी खडेबोल सुनावले.
‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने सोमवारी देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे आपण चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरांतून त्याच्यावर टीकेची झोड उठली.
सोशल मीडियावरही त्याच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, आमीरच्या वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात जितक्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यावरून त्याच्याच वक्तव्याला बळकटी येते आहे. अनेक लोक आणि शिवसेनेचे नेते आम्ही तुला पैसे दिले वगैरे सांगत आहेत. पण कोणी आमीरला देणगी दिलेली नाही. त्यांने केलेल्या परफॉर्मन्ससाठी त्याला पैसे देण्यात आले आहेत. आमीरला देश सोडून जाण्यासही सांगण्यात येते आहे. देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. आमीरविरोधात जे वातावरण सध्या देशात निर्माण झाले आहे. तीच तर असहिष्णुता असल्याचे त्यांनी सांगितले.