मराठवाडय़ात दुष्काळाची भीषणता असूनही गुरांच्या चारा-छावण्या आढळत नाहीत. काही स्वयंसेवी संस्था या संदर्भात पुढे येत असल्या तरीही सरकारचे कोणतेच योगदान नाही. अशा परिस्थितीत मराठवाडय़ात गुरांच्या चारा-छावण्या सुरू करण्यात याव्यात व रोहयोची कामे शेतकऱ्यांच्या शेतात घ्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ही कामे शेतात घेतली तरच दुष्काळावर मात करण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकतील, असेही ते म्हणाले.
पवारांच्या उपस्थितीत परभणी येथे दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळी परिषदेला संबोधीत करण्यापूर्वी पवारांनी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरातील इमारतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी आपल्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला.
मराठवाडय़ातल्या दुष्काळाची भीषणता मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची आम्ही भेट घेऊन कल्पना दिली होती. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करण्याची अजूनही आपली इच्छा नाही. दुष्काळाबाबत सरकारला सहकार्याचीच भूमिका राहणार आहे. शासनाने उपाययोजना कराव्यात, यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या महिनाभरात जर सरकारने काहीच केले नाही तर मात्र गुराढोरांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल याचा पुनरुच्चार पवारांनी यावेळी केला.
मराठवाडय़ात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न होत असले तरीही या कृत्रिम पावसाचा कोणताच उपयोग होत नाही, असा आपला अनुभव आहे. जोवर शिवारातून पाणी वाहात नाही तोवर परिस्थिती सुधारत नाही. कृत्रिम पावसाने काही फर्लाग पाऊस पडतो पण त्याचा कोणताच उपयोग होत नाही असेही पवार यावेळी म्हणाले. सध्या केंद्रीय कृषी मंत्रालयाचे व अन्य काही योजनांचेही नामकरण केले जात आहे. असे नामकरण करून प्रश्न सुटत नाहीत. अशी नावे बदलल्याने कृषी विभागाचे काय ‘कल्याण’ झाले हे कळायला मार्ग नाही. नामांतराने प्रश्न सुटतातच असे नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. या शेतकऱ्यांना भांडवलाची व्यवस्था करून मागेल त्याला काम दिले पाहिजे. थकबाकीदार शेतकरी कर्जाच्या पुनर्गठनात वगळले जात आहेत. त्यामुळे बहुतांश थकबाकीदार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याकडेही आपण केंद्रातल्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे पवार म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री फौजिया खान, सुरेश धस, जयप्रकाश दांडेगावकर, आ. विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, बाबाजानी दुर्राणी, रामराव वडकुते, विक्रम काळे, सतीश चव्हाण, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, महापौर संगीता वडकर, माजी महापौर प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.
‘तहलका’ मासिकाने बाळासाहेब ठाकरे यांचा दहशतवादी म्हणून केलेला उल्लेख तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांना पवारांनी उत्तर देण्याचे टाळले.