सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी पर्वाच्या विशेष सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी औरंगाबाद येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत उद्योजक राम भोगले यांचा सत्कारही होणार आहे. या कार्यक्रमाबरोबरच सोमवारी मराठवाडा साहित्य परिषदेने उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मे महिन्यातील पहिला सोमवार राजकीय आघाडय़ांवरील वेगवान असणार आहे.
 सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे हे नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार असून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयावर या कार्यक्रमात दिशादर्शन होईल, असे मानले जात आहे. मराठवाडय़ात जेव्हा शिक्षण प्रसाराचे काम आवश्यक होते, त्या काळात गोविंदभाई श्रॉफ यांनी ही संस्था उभी केली. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी संस्थेने भरीव काम केले. १०० र्वष पूर्ण केलेल्या शैक्षणिक संस्थांना विशेष अनुदान देण्याची घोषणा काँग्रेस सरकारने केली होती. हे सरकारही ही घोषणा अंमलबजावणीत आणते की नाही, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ७१ वर्षांपासून मराठी भाषा आणि वाङ्मय क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा तेव्हापासून संस्थेशी संबंध आहे. प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्याचा उल्लेख करत ही संस्था वाढली पाहिजे, असे यशवंतराव चव्हाणही म्हणत असत. त्यांच्या स्मृती कायम राहावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मधुकरराव मुळे असतील. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. त्यांनी शहरातील काही नामवंत व्यक्तींच्या गाठीभेटीही घेतल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या काही अधिकाऱ्यांबरोबरही त्यांनी चर्चा केली. या वेळी आमदार सतीश चव्हाण, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राजेश टोपे, माजी आमदार संजय वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.