राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडय़ात दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर येत असून, शनिवारी (दि. ३०) बीडला मुक्काम करणार आहेत. या वेळी दिवंगत अ‍ॅड. एकनाथ आवाड यांच्या कुटुंबीयांची भेट ते घेणार आहेत. दुष्काळ पाहणी दौऱ्यामध्ये पवार जिल्’ाात पक्ष संघटना बांधणीसाठीही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, असे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्हयात या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. शरद पवार हे शनिवारी जालन्याहून मादळमोही येथे भेट देऊन माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घरी मुक्कामी थांबणार आहेत. रविवारी (दि. ३१) सकाळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी नाष्टा घेऊन िबदुसरा प्रकल्पाची पाहणी, नंतर मानवीहक्क अभियानाचे अध्यक्ष दिवंगत अ‍ॅड. एकनाथ आवाड यांच्या तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहतीत जाऊन आवाड कुटुंबीयांचे सांत्वन करतील. विधानसभा निवडणुकीनंतर पवार प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा दुष्काळी पाहणीसाठी असला, तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव, त्यातून आता बाहेर पडून कार्यकर्त्यांनी काम करावे, या साठी नेते-कार्यकर्त्यांना पवार हे कानमंत्र देतील, असे मानले जात आहे.