दोन विविध क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले आणि जुन्या आठवणींमध्ये रमून गेले असे क्वचितच पाहायला मिळते. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघे एकाच व्यासपीठावर आले आणि जुन्या आठवणीमध्ये रमून गेले.

डॉ. जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा परदेशात प्रयोग होणार होता. मात्र त्या प्रयोगाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शवला. पवारांच्या माध्यमातून जब्बार पटेल यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. मात्र चर्चा करून देखील तोडगा निघाला नाही. ज्या दिवशी जब्बार पटेल आणि त्यांची टीम परदेशी जाण्यासाठी मुंबईकडे जाणार होती. त्या दिवशी १०० ते १५० शिवसैनिक खंडाळा घाटात जब्बार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अडवण्यासाठी बसले होते.

शरद पवारांनी याबाबत पोलिसांशी चर्चा केली. पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले नाही. नाटक तर, परदेशात व्हायला पाहिजे आणि शिवसैनिक तर रस्ता अडवून बसलेत. पवारांनी यावेळी एका खाजगी विमानाने घाशीराम कोतवालाच्या टीमला मुंबईला पाठवलं. मुंबईवरून जब्बार पटेल याचं विमान परदेशी गेलं. शिवसैनिक मात्र खंडाळा घाटात त्यांची वाट पहात राहिले. अशा प्रकारे शरद पवारांनी शिवसैनिकांना ‘खंडाळ्याचा घाट दाखवला’. औरंगाबादमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या ग्रंथासाठी ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ देण्यात आला.

यावेळी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. जब्बार पटेल यांना ‘नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याच्या निमिताने दोघे एका व्यासपीठावर आल्यामुळे त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. सिंहासन या चित्रपटासाठी मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालय शरद पवार यांनी कशा प्रकारे उपलब्ध करून दिलं याचे किस्से जब्बार पटेल यांनी सांगितले. तसेच घाशीराम कोतवालच्या परदेश वारीचा किस्साही सांगितला. लवकरच एक नवे नाटक घेऊन येणार असल्याचे पटेल म्हणाले. शिवाय ‘घाशीराम’ आणि ‘तीन पैशांचा तमाशा’ ही नाटक पुन्हा करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.