ओबीसींची जातवार जनगणना व्हावी, ओबीसी समाज एकत्र आला तरच मंडल आयोगाच्या शिफारसी सरकारला लागू करणे भाग पडेल, या साठी उद्या (रविवारी) येथे ओबीसी जागृती मेळाव्याचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह राज्यातील नेते या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक प्रा. सुशिला मोराळे यांनी दिली.
देशात १९९० मध्ये सरकारने ३ हजार ७४३ जातींचा, तर राज्यात २७२ जातींचा ओबीसीत समावेश केला. मंडल आयोगाच्या शिफारशी अजून लागू झाल्या नाहीत. भूमिहिनांना जमीन द्यावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे याकडे सरकारने दुर्लक्ष केले. ओबीसी समाज एकत्र आल्याशिवाय सरकार आयोगाच्या शिफारसी लागू करणार नाही, या साठी ओबीसींची जागृती करण्यासाठी शरद यादव यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. वैधानिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रताप बांगर, परीट धोबी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी िशदे, माजी केंद्रीय मंत्री निहाल अहमद, माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, प्रताप होगाडे आदी उपस्थित राहणार आहेत.