शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यातील गागोदे येथील जंगलात दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासात यावेळी मानवी अवशेष आढळून आले. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. भर पावसात पहाटे सहा ते दुपारी एकपर्यंत या परिसरात खोदकाम  करण्यात आले. या खोदकामात १० ते १२ मानवी हाडे पोलिसांच्या हाती लागली. हे मानवी अवशेष शीना बोरा हिच्या मृतदेहाचे असल्याचा तर्क आहे. मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकही येथे दाखल झाले होते. या पथकाने ही सर्व हाडे ताब्यात घेतली आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या हत्याकांडातील पुढील बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
इंद्राणी मुखर्जी आणि तिच्या साथीदारांनी २०१२ मध्ये शीना बोरा हिचे अपहरण करून तिचा खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून या जंगलात जाळून टाकला होता. सात ते आठ दिवसांनी या परिसरात दरुगधी पसरल्याने येथे शोध घेतला असता, एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह हाती लागला होता. मात्र त्यावेळी हा मृतदेह कोणाचा आहे, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. यानंतर स्थानिक पोलिसांनी या मृतदेहाची याच जंगलात विल्हेवाट लावली होती.