शीना बोरा हत्याप्रकरणात हलगर्जीपणा करणाऱया पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीला सुरूवात झाली आहे. पेण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण आणि पोलीस पाटील गणेश ढेणे यांची मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
गागोदे येथील जंगलात २०१२ मध्ये स्थानिकांना एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. यावेळी त्यावेळेचे उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, सहायक पोलीस निरीक्षक धांडे यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाच्या हाड, मास आणि केसाचे नमुने मुंबई जे जे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, प्रथमदर्शनी हा खून असल्याचे स्पष्ट होत असूनही, या घटनेची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली नाही, तसेच कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
आता तीन वर्षानंतर गागोदे परिसरात अर्धवट जळाळेल्या स्थितीत आढळलेला तो मृतदेह हा शीना बोरा हिचा असल्याचे मुंबई पोलीसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात रायगड पोलीसांचा बेजबाबदारपणाही उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱया तत्कालीन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरुडे यांनी दिले होते. या आदेशानुसार पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.