भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी प्रशिक्षण देत असल्याचे पुरावे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देऊन हिंमत दाखवावी, असे जाहीर आव्हान भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
औरंगाबाद येथे येत्या २३ व २४ फेब्रुवारी रोजी बौद्ध महासभेचे अधिवेशन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी आंबेडकर नांदेड येथे आले होते. जिल्हा परिषदेत अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या कक्षात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आंबेडकर म्हणाले की, घटनेच्या माध्यमातून व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करण्यात आले, परंतु व्यक्तिस्वातंत्र्याचा कायदा निर्माण झाला नाही. त्यामुळे आजही महिला असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचार आता दखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराला काहीअंशी आळा बसेल. महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. आज जो-तो उठतो, धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करतो. त्यामुळे समाजातील वातावरण दूषित होते. यासाठी धर्माचे अधिकार घोषित करावेत, असेही ते म्हणाले.
पूर्वी सवर्ण-दलित यांच्यात दंगली होत. आज हिंदू-मुस्लीम दंगली होत आहेत. या दंगली नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. दलितांसाठी राखीव असलेल्या राखीव जागा रद्द झाल्या तरी चालेल, याची आता गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्या वेळेस राखीव जागा रद्द कराव्यात, असे स्पष्ट केले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 या वेळी गौतम लांडगे, जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे आदी उपस्थित होते.